जेंव्हा इमारती समोर उभ्या असतात
आ वासून तुम्हाला गिळंकृत करण्यसाठी,
आणि तुम्हाला जाणवत असतो ,
गुदमरणारा श्वास !
छोट्याशा खिडकीतून वाकून बघणारे
चड्डी बनियान आणि ब्रा,
सांगत असतात तीच ती गोष्ट ,
महानगराच्या खुजेपणाची !
आणि तुमच्या बाल्कनी मधली
तजेलदार बोगनवेल देत असते,
साक्ष तुमच्या सुखवस्तूपणाची .
पण रोज रोज कॉफी प्यायला
बाल्कनीत बसायला वेळ उरलेला नसतो.
आणि खरंतर समोरच्या
Sra च्या बिल्डिंग मधून
वाकुल्या दाखवणारे
चड्डी बनियान आणि ब्रा,
न पुसून टाकता येणारा भूतकाळ,
तुमच्या मेकअपचं कोरीव काम केलेल्या
आणि परफ्युमनी न्हायलेल्या ,
नितळ त्वचेला देत असतो तडे !
चड्डी बनियान आणि ब्रा
या खासगी मालमत्तेचं
प्रदर्शन लावल्या बद्दल
‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल करता येणार नाही !
मग शोधुयात कारणं,
लवकर आणि तत्परतेने
‘त्यांना’ इथून हद्दपार करण्याची.
गावाच्या वेशीबाहेर राहायची ज्यांची लायकी
ते कसे उगवलेत,
पिंपळासारखे आपल्याच
सैनिटेरी पाईप च्या आडोशाने
त्याचा घेऊ या शोध !
मग घेऊ बाल्कनीत
कॉफी ..
समाजातल्या अंतहीन
दुही बद्दल चर्चा करत